औषधांच्या खरेदीसाठी १८ कोटींची निविदा   

पुणे: महापालिका प्रशासनाच्या झाडणकाम, सुरक्षा रक्षक पुरविणे या निविदा रिंग होत असल्यामुळे चर्चेत असतानाच; आता पालिकेच्या आरोग्य विभागाची औषध खरेदीचीही निविदाही चर्चेत आली आहे. महापालिकेकडून १८ कोटींच्या औषधांची खरेदी करण्यात येणार आहे. ही औषधे पुरविण्यासाठी एकाच वेळी २२ ठेकेदारांना समान प्रमाणात औषधे पुरविण्याचे काम देत आरोग्य विभागाने सर्व ठेकेदार समभावाचा नवीन पायंडा पाडला आहे. विशेष म्हणजे सर्वच ठेकेदारांनी एकाच दराने निविदा भरली. त्यामुळे निविदेत रिंग झाल्याची दाट शक्यता आहे.
 
महापालिकेच्या २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात या औषध खरेदीसाठी ४० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून या निधीतून ही १८ कोटींची औषध खरेदी केली जाणार आहे. तसेच दोन वर्षांसाठी ही खरेदी असणार आहे. तर, हा प्रस्ताव कार्यपत्रिकेवर न ठेवता तातडीची बाब म्हणून स्थायी समितीत दाखल मान्य करून घेण्यात आला आहे.
 
महापालिकेची रूग्णालये तसेच प्रसूतीगृहांंसाठी दरवर्षी महापालिकेकडून औषधे खरेदी केली जातात. त्यासाठीची निविदा प्रक्रीया प्रशासनाकडून जानेवारी २०२५ मध्ये राबविण्यात आली. विशेष म्हणजे या खरेदीची निविदा मुंबई आणि दिल्ली येथील स्थानिकांमध्ये देण्यात आली. या निविदांमध्ये स्पर्धा व्हावी या उद्देशाने ही जाहिरात देण्यात आली. या निविदांंमध्ये २३ ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यांची प्री बीड मिटींगही घेण्यात आली. मात्र,त्यात काही ठेकेदारांनी मुदत मागितल्याने पालिकेकडून त्यांना ८ दिवसांची मुदतवाढही देण्यात आली. त्यानंतर एक ठेकेदार अपात्र ठरला आहे.महापालिकेने काढलेली निविदा सुमारे २८५ कंपन्यांच्या औषधांची आहे. त्यामुळे, औषधानुसार ज्या ठेकेदाराचे दर कमी असतील त्याच्या कडून त्याला समान प्रमाण निश्चित करून दिलेल्या रकमेमधून ही औषधे खरेदी केली जाणार आहेत. तर जाहीरात दिल्लीमधील दैनिकात दिली असली तरी मुंबईतील तीन, कोल्हापूर मधील एक आणि पिंपरी- चिंचवड मधील एक ठेकेदार वगळता उर्वरीत १८ ठेकेदार हे पुणे शहर व जिल्ह्यातील आहेत. तसेच या प्रस्तावात पुढील दोन वर्षांसाठी आवश्यकता असेल तेव्हा आरोग्य विभागाला खरेदी करण्याची मुभाही देण्यात आली आहे.
 

Related Articles